®अधिवेशन वृतसेवा, भरपूर चुका करतात हो! १. जोडीदार स्वतःसाठी असतो हे विसरतात आणि आई बाबा, समाज अशा इतर लोकांच्या हिशेबाने जोडीदाराकडून अपेक्षा ठेवतात. “बाकी काही नको पण माझ्या आईला सुखात ठेव” अशा कमाल अपेक्षा असतात मुलांच्या! दुसर्याना सुखात ठेवायला आपण लग्न करू नये कारण कुणाचं सुख कशात असतं हे आपल्याला कसं कळणार?! तेव्हा जोडीदार आणि मी आनंदात राहू ना, हे आधी बघायला हवं. २. जरा वेगळा विचार कुणीच करत नाही. मुलगा म्हणत नाही की मला यशस्वी माझ्याहून जास्त कमावती मुलगी चालेल. मुली म्हणत नाहीत की मला माझ्याहून कमी कमावता घर सांभाळणारा मुलगा चालेल. मुलं मान्य करत नाहीत की स्वयंपाक करणे, सासू सासर्यांची जबाबदारी घेणे, मुलांचे संगोपन ही त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. आणि घरात पैसे आणणे, त्याचे व्यवस्थापन, थोडी रिस्कची कामे करणे हे आपल्यालाही जमू शकतं हे अनेक मुलींच्या खिजगीणतीत सुद्धा नसतं. पारंपरिक अपेक्षा बदलायला हव्यात! ३. एखाद्या माणसासोबत आयुष्य काढायचं तर नुसतं आखीव रेखीव माणूस शोधून काय उपयोग? एखादं माणूस हुशार, मनमिळाऊ, गुणी, कामसू, श्रीमंत असं काहीही असलं तरी त्या गुणाचा आपल्याला आयुष्यात काही ना काही उपयोग होतोच. सौंदर्याचा उपयोग असा काय? हं पहिले काही दिवस छान वाटेल, पण जन्मभर तसं वाटत रहात नाही. तुम्ही तुमचे आई बाबा बहीण भाऊ सुंदर आहेत की कुरूप ह्याकडे कधी लक्ष दिलं आहे का? आपलं लक्ष जातच नाही तिकडे कारण ती आपली माणसं असतात. तसंच हे माणूस काहीच दिवसात आपलं होणार असतं. त्याचा स्वभाव इतका महत्वाचा असतो की दिसणं दुय्यम असायला हवं. पण लोकं फोटो पाहून गुणी लोकांना नाकारतात. माणूस भेटून बोलून कळतो, नुसता फोटोतून नाही. ४. आपली कुवत न ओळखता अवास्तव अपेक्षा ठेवतात. मुलांना पैसे कमावणारी पण त्यांच्या ताब्यात राहणारी, चांगल्या घरातली पण लग्नानंतर माहेर विसरणारी, मॉर्डन पण आईला आवडेल म्हणून धर्मिक अशी आखुडशिंगी बहुगुणी मुलगी हवी असते. तर मुलींना सेटल्ड पण ताब्यात रहावा असा, आपण काहीही कमवत नसलो तरी तो लाखो कमावणारा, तरुण पण घर दार बंगला गाडी सगळं सगळं असलेला, माझ्या माहेरी मुलगा बनून रहाणारा पण स्वतःच्या आईबापाला सोडून देणारा असा नवरा हवा असतो. थोडं नमतं घेण्याची तयारी असलेली बरी असते, पण दोघांमध्येही ती नसते. ती असणं एकंदरीत संसाराला आवश्यक गुण आहे. सगळीच मुलं-मुली अशी नसतात पण साधारणपणे असं घडताना दिसतं खरं. ★★★★★