®अधिवेशन वृतसेवा, लंडन : अल्कोहोलचे व्यसन नसलेल्या रुग्णांपेक्षा हे व्यसन जडलेल्या रुग्णांचा जवळपास आठ वर्षे अगोदर मृत्यू होत असल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे जास्त दिवस जगायची इच्छा असेल तर दारूला नाही म्हणण्याची सवय मद्यप्रेमींनी लावून घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. र्जमनीच्या बॉन हॉस्पिटल विद्यापीठातील संशोधकांच्या चमूने अल्कोहोलचे व्यसन असलेल्या व व्यसन नसलेल्या रुग्णांचा दीर्घकाळ अभ्यास करून केलेल्या संशोधनाअंती हे निष्कर्ष मिळाले आहेत. अल्कोहोलच्या सेवनामुळे व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होतो, हे यादरम्यान आम्हाला दिसून आल्याचे या संशोधनाचे प्रमुख डाईटर शोफ यांनी सांगितले. ब्रिटनच्या सामान्य रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या अल्कोहोलचे सेवन करणार्या रुग्णांचा अल्कोहोल न घेणार्या रुग्णांपेक्षा सरासरी ७.६ वर्षे अगोदरच मृत्यू झाल्याचे यादरम्यान आमच्या निदर्शनास आल्याचे ते म्हणाले. यासाठी अल्कोहोलचे व्यसन असलेले २३,३७१ रुग्ण व अल्कोहोलचे सेवन न करणार्या २३३७१0 रुग्णांसोबत तुलनात्मक अभ्यास केल्याचे ते म्हणाले. यादरम्यान अल्कोहोलचे सेवन करणार्या पाचपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्या तुलनेत अल्कोहोलचे सेवन न करणार्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असल्याचे आढळून आले. अल्कोहोलचे सेवन न करणार्या १२ पैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. या दोन्हींचा सखोल अभ्यास केला असता वरील निष्कर्ष निघाल्याचे शोफ म्हणाले. ‘युरोपियन मानसशास्त्र’ या नियतकालिकात याविषयीचे विस्तृत संशोधन छापून आले आहे.