उल्हासनगर : विस्थापनातून उभे राहिलेले औद्योगिक शहर

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) अंतर्गत येते. २०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ५,०६,०९८ इतकी होती. उल्हासनगर हे नगरपालिका शहर असून त्याच नावाच्या तहसीलचे मुख्यालय आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य मार्गावरील हे एक महत्त्वाचे उपनगरीय स्थानक आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात, हिंदुस्थानाची फाळणी होण्यापूर्वी उल्हासनगर म्हणजेच तत्कालीन कल्याण कॅम्प हा विस्तृत परिसर ब्रिटिश सैन्याची वसाहत होता. दलदलीच्या व पठारासदृश भागात १९४२ साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुमारे ६,००० ब्रिटिश सैनिकांच्या निवासासाठी २,००० बराकी उभारण्यात आल्या. त्या काळी या बराकींमध्ये पुढील अनेक दशके कुटुंबांच्या दोन-तीन पिढ्या वास्तव्यास राहतील आणि येथे एक औद्योगिक शहर उभे राहील, अशी कल्पनाही कुणी केली नसेल.
१३ किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेले उल्हासनगर शहर आजही केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या अखत्यारीत येते. भारत–पाकिस्तान फाळणीदरम्यान पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सिंधी व्यापाऱ्यांवर हिंदू असल्याचा ठपका ठेवून त्यांना भारतात पाठविण्यात आले. त्या विस्थापित नागरिकांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर होते. देशातील विविध प्रांतांचा अभ्यास केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील लष्करी कल्याण छावणीत या विस्थापितांना वसविण्यात आले. कालांतराने याच कल्याण छावणीचे रूपांतर उल्हासनगर शहरात झाले.
पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या सुमारे ९४,४०० नागरिकांच्या निवासाची व्यवस्था येथे करण्यात आली होती. मात्र अनेकांच्या डोक्यावर छप्परही नव्हते. अनेक विस्थापितांनी उल्हासनगरमधील मोकळी जमीन ताब्यात घेऊन स्वतःची घरे उभारली. गच्च भरलेल्या बराक्या आणि मोकळ्या जमिनींवर उभ्या राहिलेल्या अस्थायी झोपड्यांमधून फाळणीची वेदना स्पष्टपणे दिसून येत होती.
फाळणीपूर्वी कराची येथील मनोरा बेटावर मालवणी, तेलगू, धोबी, कच्छी तसेच सिंध प्रांतातील सिंधी अशा विविध समाजांचे हिंदू वास्तव्यास होते. फाळणीनंतर या सर्वांना भारतात स्थलांतरित करण्यात आले आणि मुंबई बंदरातून त्यांचे पुनर्वसन कल्याण कॅम्प (उल्हासनगर) येथे करण्यात आले. ८ ऑगस्ट १९४९ रोजी तत्कालीन राज्यपाल सी. राजगोपालाचारी यांनी या निर्वासितांच्या शहराला अधिकृतपणे उल्हासनगर असे नाव दिले.
फाळणीनंतर जेवढे शक्य होते तेवढ्या साधनसामग्रीच्या बळावर सिंधी समाजाने लहान-मोठे उद्योगधंदे सुरू केले. मुंबई ही नजीकची मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याने त्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढला. त्याचबरोबर फाळणीनंतर उल्हासनगरात आलेल्या मराठी भाषिकांना बंदर व नौकानयनाचा अनुभव असल्याने अनेकांना मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये रोजगार मिळाला.
विस्थापनाच्या वेदनांतून उभे राहिलेले उल्हासनगर आज एक महत्त्वाचे औद्योगिक व व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते. संघर्ष, कष्ट आणि जिद्दीच्या बळावर आकाराला आलेले हे शहर सामाजिक एकोपा आणि उद्यमशीलतेचे जिवंत उदाहरण ठरले आहे. ★★★★★

Scroll to Top