महादेवाचा नंदी मंदिराच्या बाहेर का बसलेला असतो?

®अधिवेशन वृतसेवा, शिलाद मुनी आजन्म ब्रह्मचर्याचे पालन करत होते किंतु एक वेळेस त्यांना अचानक मनात विचार आलेत की ह्यामुळे माझे वंश राहणारच नाही. म्हणुन त्यांनी इंद्रांकडून पुत्र मागितला. परंतु इंद्र त्यांची ही पुत्रप्राप्तीची इच्छा पुर्ण करू शकत नव्हते. इंद्रांनी, शिलाद मुनींना सांगितले की तुम्ही शंकराची आराधना करा, तुमची इच्छा ते पुर्ण करतील. शिलाद मुनींनी तपश्चर्या करून शंकर भगवान ह्यांना प्रसन्न केले आणि पुत्रप्राप्तीची आपली इच्छा सांगुन दाखवली. तुमची इच्छा नक्कीच पुर्ण होईल असं महादेवाने सांगितले. एके दिवशी आपल्या आवारात चालत असतांना त्यांना वाटेत एक गोर गोमटं बाळ सापडलं. ते जेव्हा त्याच्याजवळ गेलेत तेव्हा आकाशवाणी झाली की, “ह्याचे संगोपण करं. हा मुलगा तुझं आयुष्य सुख-समृद्धीने भरून देईल”. शिलाद मुनींनी ह्या मुलाचे नाव नंदी ठेवले. नंदी अर्थात नंद, नंदु, आनंद असा होतो. नंदी अभ्यासात आणि इतर विद्या शिकण्यात खुप तरबेज होता शिवाय तो अत्यंत आज्ञाकारी होता. एके दिवशी शिलाद मुनींच्या आश्रमात दोन साधु आलेत ज्यांचे नाव मला सध्या आठवत नाहीये. शिलाद मुनींनी त्यांची राहायची आणि सेवा करायची जबाबदारी नंदीकडे दिली जी त्याने एकदम व्यवस्थितपणे पार पाडली. जातांना त्या दोन्ही साधुंनी शिलाद मुनींना “शतायुषी भवः” असा आशिर्वाद दिला परंतु नंदीला आर्शिवाद देतांना ते थोडे कचरले. ते सगळं शिलाद मुनींनी पाहिले. जेव्हा साधु बाहेर निघत होते तेव्हा नंदीपासुन लपुन छपून त्यांनी त्या दोघांना आपली शंका विचारली. त्यावर ते साधु म्हणाले की, आम्ही नंदीला शतायुषीचा आशिर्वाद नाही देऊ शकत कारण त्याच आयुष्य कमी आहे. हे एकून शिलाद मुनींना रडू कोसळले. इकडे ते नंदीने ते चटकन ओळखले आणि त्यांना विचारले की झाले काय? बराच वेळ सावरून झाल्यावर शिलाद मुनी घडलेलं सगळं नंदीला सांगतात. आपले आयुष्य कमी आहे हे ऐकून काळजी करण्यापेक्षा नंदी जोर जोरात हसतो. शिलाद मुनींना हे पाहून आश्चर्य वाटते. नंदी म्हणतो की, तुम्हाला साक्षात महादेवांनी दर्शन दिले होते ना? मग मी पण त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून आयुष्य मागतो असं म्हणुन नंदी महादेवाची उपासना करायला बसतो. नंदी हुशार असल्यामुळे महादेव लगेच प्रसन्न होतात. त्यांचे ते विराट रूप पाहून नंदी भारावून जातो आणि त्याची काहीच न मागण्याची इच्छा होते. तरी नियमानुसार त्याला मागावे लागणार असते. म्हणुन नंदी म्हणतो की “मला तुमच्याजवळ राहायचं आहे ते पण कायम”. हे ऐकून महादेव त्याला म्हणतात की, “माझ्याकडे असलेला बैल मरण पावला आहे, तु त्याच्या जागेवर आजपासून राहशील. तु माझे वाहन बनशील आणि समस्त गणांचा मुख्य ही तुच राहशील.” तेव्हा पासुन नंदी बैलाच्या रूपात महादेव जवळच असतो. समुद्रमंथानाच्या वेळी हलाहल नावाचे विष बाहेर आले होते जे समस्त सृष्टीसाठी घातक होते. त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग होता ते म्हणजे कोणीतरी ते प्राशन करायला हवे. सगळ्या देवांनी तेव्हा हे काम फक्त महादेवच करू शकतात असा विचार करून त्यांना विषप्राशानाची विनंती केली होती. महादेवांनी हलाहल विष पिल्यानंतर त्यांच्या गळा निळसर पडला आणि त्यांना जळजळ व्हायला लागली. म्हणुन त्यांना निळकंठ किंवा विषकंठ असं म्हटले जाते. महादेव ध्यानस्थ बसण्याचा प्रयत्न करत परंतु त्यांच्या गळ्यात होणाऱ्या जळजळ मुळे ते ध्यान करू शकत नव्हते. त्यावेळेस नंदी त्यांच्यासमोर बसून त्यांच्या गळ्याला फुंकर घालु लागला ज्यामुळे महादेव ह्यांच्या गळ्यात होणारी जळजळ थांबली. तेव्हापासून महादेवाची ध्यानस्थ समाधी तुटू नये म्हणुन नंदी त्यांच्यासमोर असतो आणि फुंकर घालत असतो अशी कथा आहे.

Scroll to Top