
®अधिवेशन वृत्तसेवा, पालघर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता होताच बोईसर विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी आमदार विलास तरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. बैठकीस शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्यासह महसूल, वसई-विरार महानगरपालिका, महावितरण, आरोग्य, कृषी व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ग्रामीण भागातील प्रत्येक गावात तसेच वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक प्रभागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ व वस्तुनिष्ठ पंचनामे करून पात्र नागरिकांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळेल, यासाठी विलंब न करता कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. महसूल विभाग व महानगरपालिकेने संयुक्त पाहणी करून पंचनाम्याची प्रक्रिया गतीमान करण्यावर भर देण्यात आला.
पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य, पिण्याचे पाणी व इतर जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाला देण्यात आल्या. कोणतेही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले. शहरातील नाले, गटारे व जलनिस्सारण व्यवस्थेचा स्वतंत्र अभ्यास करून नैसर्गिक नाल्यांची मूळ रुंदी कायम ठेवणे, अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर कायदेशीर कारवाई करणे तसेच भविष्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. मौजे राजावली व टिवरी परिसरातील महसूल विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणांची तात्काळ पाहणी करून नियमानुसार कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले. महावितरण विभागाने वसई, विरार, पालघर व बोईसर विभागातील वीजपुरवठ्याबाबतचा आढावा सादर केला. त्यानंतर तांत्रिक अडचणी दूर करून वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश आमदार विलास तरे यांनी दिले.
पूरानंतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घ्यावी, सर्पदंशावरील औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करावी तसेच प्रत्येक गावात फिरते दवाखाने पाठवून नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचाराची व्यवस्था करावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. कृषी विभागाला शेतजमिनीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून यादी प्रशासनाकडे व आमदार कार्यालयाकडे सादर करण्यास सांगण्यात आले, जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेत मिळू शकेल. बैठकीच्या शेवटी आमदार विलास तरे यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून पूरग्रस्तांना तात्काळ दिलासा द्यावा, शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत उपलब्ध करून द्यावा आणि भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यावर भर द्यावा, असे निर्देश दिले. बैठकीस आमदार विलास तरे, शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर, शेखर घाडगे, तहसीलदार दीपक गायकवाड, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष चौधरी, मनपा सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी, निलेश म्हात्रे, कृषी अधिकारी सुरेज जाधव, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.