वधू-वर सूचक केंद्र काळाची गरज

®अधिवेशन वृतसेवा, ठाणे: ‘लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ अशी म्हण प्रचलित आहे. कारण लग्न म्हटलं की, सुयोग्य वधू-वर शोधण्याचे पालकांसमोर मोठे आव्हानच असते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याच समाजातला किंवा विशिष्ट विभागातलाच अनुरूप जोडीदार शोधणे कठीण झाले आहे. यालाच पर्याय म्हणून वधू-वर सूचक केंद्रांच्या साथीने एका क्लिकवर घरबसल्या अनुरूप जोडीदार शोधण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. या वधू-वर सूचक केंद्रांना आता भलताच भाव आला असून ही केंद्रे आधुनिक काळाची गरज झाली आहेत. पूर्वी नातेवाईक, आप्तेष्ट यांच्यावर लग्न जमवण्याची जबाबदारी होती. एकमेकांवरची विश्‍वासार्हता आणि एकत्र कुटुंब पद्धतीची प्रथा असल्यामुळे अनुरूप जोडीदार शोधण्याची जबाबदारी एकत्रितपणे सर्वांच्याच खांद्यावर होती मात्र कामानिमित्त समाजातील विविध घटकांना गावं सोडून शहरी भागात स्थलांतरित व्हावे लागले. यातील बहुतांश लोकांनी कायमस्वरूपी शहरातच राहाणे पसंत केले. आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत फ्लॅट संस्कृती आणि धकाधकीच्या जीवनात संवाद तसेच नात्यातील प्रेमाची हिरवळ कमी होत आहे. इतकेच नाही तर आपल्या शेजारी कोण राहते याचीही आपल्याला नीट माहिती नसते, तिथे आपल्या समाजाचा, गावचा आणि साजेसा जोडीदार शोधणे हे आजच्या पालकांसाठी मोठे आवाहनच निर्माण झाले आहे. लोकांची ही गरज लक्षात घेऊनच वधू-वर सूचक केंद्रांचे पेव फुटले. लोकांच्या उत्तम प्रतिसादामुळे या सूचक केंद्रांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली असून, दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढतच आहे. मराठा, कुणबी, माळी, सोनार, ब्राह्मण, बौद्ध अशा एक ना अनेक जाती आणि पोटजातीतील सुयोग्य स्थळ आता घरबसल्या एका क्लिकवर शोधणे सहज शक्य झाले आहे. यासाठी लागणारा अर्जही इंटरनेटवर भरून त्यासाठी लागणारी फी सुद्धा ऑनलाइन भरण्याची सोय असल्यामुळे पालकांवरचा ताणही मोठय़ा प्रमाणावर कमी झाला आहे. पूर्वी ठाणे, मुंबई, पुण्यासारखा शहरी भागात बोटावर मोजण्याइतकीच काही विशिष्ट समाजाची वधू-वर सूचक केंद्रे होती. आधुनिक तंत्रप्रणालीचा अभाव असल्यामुळे नाव नोंदवण्याची प्रक्रियाही क्लिष्ट होती आणि दरवेळी वधू-वरांचा प्रत्यक्ष पाहण्याचा कार्यक्रम होत होता. आता मात्र शहरी तसेच ग्रामीण भागातही ठिकठिकाणी या सुचक केंद्राचे बोर्ड नजरेस पडत आहेत. तसेच मुलं-मुली स्वत: संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइनच एकमेकांना पाहण्याचा कार्यक्रम झटपट उरकून निर्णय घेत असल्याने पालकांनाही या सूचक केंद्रांचा मोठा आधार वाटत आहे. सर्वच वृत्तपत्रांमध्ये असंख्य वधू-वर सुचक मंडळाच्या जाहिराती पाहावयास मिळतात. ही सूचक मंडळं आजच्या काळात अत्यंत निकडीची झाली असून, एक नवीन व्यवसाय म्हणून बहुतांश लोक या क्षेत्राकडे वळत असल्याचे दिसून येते. ★★★★★

Scroll to Top