खान्देशची कुलस्वामिनी आदिशक्ती श्री एकविरा देवी मंदिर हे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
अधिवेशन वृत्तसेवा
धुळे : महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात एकविरा देवीचे मंदिर आहे. शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पांझरा नदी काठावर देवपूर भागात एकविरा देवी मंदिर आहे. हेमाडपंथीय, पूर्वाभिमुखी हे मंदिर आहे. भक्तांच्या संकटांना धावणारी, त्यांची कामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी, स्वयंभू अशी ही देवी एकविरा आहे. भाविकांची एकविरा देवीप्रती मोठी श्रध्दा आहे. महाराष्ट्रातील अतिशय जागृत पाचवे शक्तीपीठ म्हणून हे देवस्थान ओळखले जाते. सुर्यकन्या तापी नदीची उपनदी म्हणून ओळखल्या जाणा-या पांझरा नदीच्या तीरावर आदिमाया एकवीरा देवीचे अतिप्राचीन मंदीर आहे. धुळे शहरातील देवपूर या उपनगरात असलेल्या या मंदिरातील शेंदूर लेपीत आणि पद्मासनी बसलेली ही स्वयंभू देवी आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूस गणपती व डाव्या बाजूस तुकाई मातेची चतुर्भूज शेंदूर लेपनाची मूर्ती आहे. नंदादीप सतत तेवत राहावा म्हणून साडेचार फूट उंचीच्या दोन मोठ्या समया आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि गुजरातमधील अनेक भाविकांची कुलदेवता एकविरा देवी असल्याने येथे सतत वर्दळ असते. आपल्या पराक्रमाने संपूर्ण जगात नावलौकीक कमावलेल्या परशूराम या वीरपुत्राची आई म्हणून आदिशक्ती एकवीरा देवी ओळखली जाते. एकवीरा आणि रेणुका माता या दोन्ही आदिमाया पार्वतीचीच रूपे असून देवीने अनेक अवतार धारण करून असुरांचा नाश केल्याची मान्यता आहे. जमदग्नी ऋषींची पत्नी असलेल्या रेणुका मातेचा परशुराम हा वीर पुत्र असल्याने या देवीला ‘एक वीरा’ असे म्हटले जात होते. पुढे तेच नाव एकवीरा म्हणून रूढ झाले. महाराष्ट्रासोबचत कर्नाटक राज्यातही देवीचे मंदिर असून तेथूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आजही या मंदिराच्या आवारात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली पायऱ्यांची जिवंत विहीर आहे. खान्देशची कुलस्वामिनी असलेली एकविरा देवी ही २५० कुळांची कुलदैवत आहे. या मंदिराला थोडा थोडका नाही तर तब्बल पाचशे वर्षाचा इतिहास आहे. १९८७ सालात मध्ये या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराचा सभा मंडप ३६ फूट बाय ४० फूट असून त्याची उंची १५ फूट आहे. हवा खेळती रहावी म्हणून मोठ मोठे दरवाजे आणि खिडक्या आहेत. पूर्वेस मोठ्या दरवाजावर मधोमध गणपतीची स्थापना केली आहे. या दरवाजाच्या पुढे मोठा दगडी पुरातन कमानी दरवाजा असून त्यावर नगारखाना आहे. त्यानंतर मंदिराच्या पायऱ्या आहेत. दोन्ही बाजूस मोठे ओटे आणि हत्तींच्या दोन भव्य प्रतिकृती आहेत. समोर घाट असून पांझरा नदीचे विस्तीर्ण पात्र नजरेस पडते. मंदिर परिसरात शितला माता, खोकली माता, परशुराम, हनुमान, विठ्ठल रुक्मीणी, गजानन महाराज, साईबाबा, महादेव यांची मंदिरे असून या सर्व मंदिरांना स्वतंत्र कळस आहेत. या ठिकाणी शमीचा पुरातन वृक्ष असून त्या वृक्षाखाली कालभैरव, शमी देवीचे मंदिर आहे. पश्चिमेस महालक्ष्मीचे मंदिर असून चार खोल्यांची जुनी धर्मशाळा आहे. उत्तरेस सर्वसोयींयुक्त तीन खोल्या असून भाविकांना पिण्यासाठी थंड पाण्याची सोय आणि शूचिर्भूत होण्यासाठी जलकुंभ आहे. एकविरा देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम होतात. सोबतच चैत्रात यात्रा भरते, तेव्हा अनेक भाविक नवसपूर्ती, कुळधर्म, जावळं काढण्यासाठी येतात. यात्रेपूर्वी देवीची पालखी, शोभायात्रा काढण्याची जुनी परंपरा आहे. दर पौर्णिमेला मंदिराच्या आवारात पालखी निघते. मंदिरात गुढीपाडवा, अक्षयतृतीया, आषाढी एकादशी, श्रावणमास, गणेश चतुर्थी, शारदीय नवरात्रोत्सव, ललितापंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, कोजागरी पौर्णिमा, कार्तिक स्नान, नरक चतुर्दशी, कार्तिकी एकादशी, अष्टमी, त्रिपुरारी पौर्णिमा, मकरसंक्रांत, महाशिवरात्र, शितलामाता उत्सव देखील मोठ्या जल्लोषात साजरे होतात.