जीवन प्रमाणपत्र काय आहे? सेवानिवृत्तीनंतर म्हणजेच नियमित उत्पन्न स्रोत बंद झाल्यानंतर व्यक्तीच्या आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यक्तींना सेवानिवृत्ती पश्चात निर्वाहासाठी निधी तयार करण्यात मदत करण्यासाठी सरकारने विविध प्रायोजित पेन्शन योजना सुरू केल्या आहेत. परंतु अशा पेन्शनचा लाभ घेण्यासाठी, पात्र व्यक्तींनी त्यांच्या खात्यात पेन्शन वितरित करण्यासाठी अधिकृत असलेल्या संस्थेला ‘जिविताचे प्रमाणपत्र’ (लाइफ सर्टिफिकेट) सादर करणे आवश्यक असते. असे प्रमाणपत्र पेन्शन प्राप्त करण्यासाठी लाभार्थी जिवित असल्याचा पुरावा या रूपाने काम करते. पूर्वी जीवन प्रमाणपत्र मिळवण्याची किंवा पेन्शन वितरण संस्थेसमोर हजर राहण्याची प्रक्रिया लांबलचक आणि त्रासदायक होती. विशेषत: वृद्ध आणि आजारी लोकांसाठी. पेन्शन वितरणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, भारत सरकारने संपूर्ण प्रक्रिया ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट’ किंवा भारत जीवन सन्मान पत्राद्वारे पूर्णपणे डिजिटल आणि सुलभ केली आहे. जीवन प्रमाणपत्र हे भारत सरकारच्या पेन्शन योजनेसाठी लाभार्थींना उपलब्ध केले जाणारे जिविताचे डिजिटल प्रमाणपत्र आहे. ही निवृत्ती वेतनधारकांसाठी ‘आधार’वर आधारित डिजिटल सेवा आहे जी बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रणालीद्वारे समर्थित आहे आणि पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अतिरिक्त सुविधा आहे. ‘लाइफ सर्टिफिकेट’ मिळवण्याच्या प्रक्रियेला सुव्यवस्थित करण्यासाठी आणि ते जलद आणि त्रासमुक्त करण्यासाठी ती कार्य करते. राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा इतर सरकारी संस्थांकडून पेन्शन मिळवणाऱ्या व्यक्तींना ही डिजिटल सुविधा निश्चितच खूपच फायद्याची ठरली आहे. हे डिजिटल प्रमाणपत्र आयटी कायद्यांतर्गत मान्यताप्राप्त आहे आणि त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पेन्शन वितरण एजन्सीसमोर प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज संपुष्टात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे. कारण त्याचा उपयोग पेन्शनशी संबंधित कामांमध्ये होतो. कोणत्याही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासाठी पेन्शन खूप महत्त्वाची असते. पेन्शन हा त्यांचा आर्थिक आधार असतो. त्यातून त्यांच्या गरजा पूर्ण होतात. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीतही मदत करते. पेन्शन वितरण करणार्या एजन्सीला पेन्शनसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याने जीवन प्रमाणपत्र कसे सहज बनवता येईल हे समजून घेतले पाहिजे. यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) काही सोप्या पद्धती सुचवल्या आहेत. पेन्शनधारकांना दरवर्षी त्यांचे जीवन प्रमाणपत्र त्यांच्या संबंधित बँकेत जमा करणे आणि बायोमेट्रिक पुरावे देणे अनिवार्य आहे. पण वाढत्या वयामुळे काहींना वैयक्तिकरित्या बँकेत जाणे कठीण होऊ शकते आणि अशा लोकांसाठी सरकारने काही सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यांचा ज्येष्ठ नागरिक घरबसल्या फायदा घेऊ शकतात. पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सरकारने गेल्या वर्षांपासून आधार डेटाबेसवर आधारित फेस-रिकग्निशन तंत्रज्ञान प्रणाली तयार केली आहे, ज्यामुळे Android आधारित स्मार्टफोन असलेल्या कोणालाही डिजिटल जीवन प्रमाणपत्र प्रदान केले जाते.
फेस ऑथेंटिकेशनद्वारे लाइफ सर्टिफिकेट बनवण्याची प्रक्रिया,
1. इंटरनेटसह अँड्रॉइड स्मार्टफोनचा ५ मेगा पिक्सेल कॅमेरा वापरा
2. पेन्शन वितरण प्राधिकरणाकडे आधार क्रमांक नोंदवून ठेवा
3. AadharFaceRd अॅप डाउनलोड करा.
4. https://jeevanpramaan.gov.in/package/download वरून जीव प्रमाण फेस अॅप्लिकेशन डाउनलोड करा त्यानंतर ऑपरेटरचे ऑथेंटिकेशन आणि फेस स्कॅन करा.
पेन्शनधारक तुमचा तपशील भरा समोरच्या कॅमेराने फोटो काढा आणि सबमिट करा. प्रस्तुत केलेल्या तपशीलांची यूआयडीएआय द्वारे पडताळणी केली जाईल आणि नोंदणीनंतर जीवन प्रमाणपत्र आयडी तयार केला जातो.