बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या रक्षणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना साकडे, सोयगावात सकल हिंदू समाजाचे प्रशासनाला निवेदन

®अधिवेशन वृतसेवा, दिलीप शिंदे/सोयगाव, सोयगाव दि.१० : बांगला देशात अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोयगावात सकल हिंदू समाजाच्या वतीने दि. १० मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालय पर्यंत निषेध रॅली काढण्यात आली.यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना प्रशासनाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.  बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून या देशात अल्पसंख्यांक हिंदूच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जिविताचे हनन होत आहे. हिंदू मंदिरांची तोडफोड, जाळपोळ, नासधूस केली जात आहे. हिंदु अबाल ,वृध्द आणि महिलांवर धर्मांध मुस्लिमांकडून सामुहिक अमानवीय अत्याचार वाढत आहे . बांगला देशातील अल्पसंख्यांक हिंदुंच्या रक्षणासाठी भारत सरकारने जागतिक स्तरावरून पावले उचलून कठोर कार्यवाहीची मागणी करावी. अमानवीय अत्याचारांमुळे बागला देशातील हिंदू समूदाय त्रस्त आणि व्यथीत झाला आहे. जगभरातील हिंदू समुदायाने याची दखल घेतली आहे. बांगलादेशात सूरू असलेल्या धार्मिक अत्याचारामुळे हिंदूचे आणि विभिन्न धर्मियांचे स्वातंत्र्य सहजीवन धोक्यात आले असून बांगलादेश शासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी इस्कॉन च्या चिन्मयकृष्ण महाराज यांना देशद्रोहाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून हिंसात्मक पध्दतीने करण्यात आलेली अटक निंदनीय आणि अशोभनीय आहे. त्यांच्या अटकेनंतर बांगला देशातील हिंदू समाजाने लोकशाही पध्दतीने केलेल्या आंदोलनास हिंसात्मक पध्दतीने चिरडण्यात आले असून अटकेत असलेल्या चिन्मयकृष्ण महाराजांना कारागृहात शाकाहारी भोजन आणि योग्य औषधोपचार दिले जात नाही. त्यांना कारागृहात कट्‌टर मुस्लिम दहशतवादी संघटनांशी संबंधित अतिरेक्यांसोबत ठेवल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. हिंदूंचे धार्मिकस्थळ आणि मंदिरांचे संरक्षण, हिंदू धर्माचार्य इस्कॉनचे चिन्मयकृष्ण महाराज सह अन्य हिंदू धर्माचार्य यांची सुटका, हिंदु महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध, समाज माध्यमातून बांगला देशातील हिंदू मुली व महिलांवर अमानवीय अत्याचार आणि त्यांच्या मानवाधिकारांचे हनन थांबविण्यात यावे अश्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसिल प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी  सुधीर नाना कुलकर्णी, सुनील गव्हांडे, गजानन चौधरी, सुधनवा केनेकर, दीपक कोरडे, योगेश नागपुरे, सचिन चौधरी, मयुर चौधरी, महेश मानकर,राम सोहनी, योगेश मानकर, कमलेश काळे, संजय मोरे, कृष्णा पाटील,हर्षल अस्वार, भारत हिरे, लोकेश पाटील, दीपक पाटील, विजय गव्हाड, राजू फुसे, राहुल मानकर, रविराज गिरी, पप्पू पठाडे, अजय नेरपगारे आदींसह सकल हिंदू समाजातील अनेकांची उपस्थिती होती. ★★★★★

Scroll to Top