
®अधिवेशन वृतसेवा, मुंबई : तोतया व्यक्तींना पुढे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करण्याचे प्रकार समोर येत असून, मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक रमेश पगार यांनी केले आहे.
अंधेरी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात २९ जानेवारी रोजी घडलेला गंभीर प्रकार उघडकीस आला. एका तोतया व्यक्तीने स्वतःला मूळ मालक म्हणून दर्शवत बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी केल्याचे समोर आले. या प्रकरणी सलाउद्दीन आदम नाईक या मूळ मालकाच्या जागी स्वतःला भासवणाऱ्या मोहम्मद रफीक मोहम्मद इलियास याच्याविरुद्ध जूहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सह जिल्हा निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री, गहाणखत, बक्षीसपत्र, हक्कसोडपत्र, पॉवर ऑफ अॅटर्नी, करारनामे, विकास करारनामे आदी स्वरूपाची मोठ्या प्रमाणात नोंदणी कामे होत असतात. अशा पार्श्वभूमीवर फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी व्यवहार करताना कागदपत्रांची शहानिशा करणे, मालकाची ओळख खात्री करून घेणे आणि कायदेशीर पडताळणी करणे आवश्यक असल्याचे सह जिल्हा निबंधकांनी स्पष्ट केले.
भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीतून मूळ मालकांची हानी होऊ नये, यासाठी नागरिकांनी अधिक जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.