ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; सर्वत्र तीव्र निषेध

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : ज्येष्ठ पत्रकार, कट्टर शिवसैनिक व निर्भीड राजकीय विश्लेषक दिलीप मालवणकर यांच्यावर तीन अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा हल्ला अत्यंत भ्याड व निषेधार्ह असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर थेट आघात करणारा असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला राजकीय वादातून झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, काही राजकीय घटकांचा या हल्ल्यात सहभाग असण्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. बंटी मोरे व त्यांच्या संपूर्ण टीमकडून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे.
हल्ल्यात मालवणकर यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून त्यांना तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय स्तरांतून करण्यात येत आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पत्रकारांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top