
अलिबाग : महाराष्ट्राची शान मानल्या जाणाऱ्या एसटी सेवेत मुरुड–कल्याण मार्गावरील बस वेळेत सुटत नसल्याने प्रवाशांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रोजंदारी कामगार, विद्यार्थी, रुग्ण तसेच नोकरीधारकांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळापत्रक असूनही बस उशिरा सुटणे किंवा अनिश्चित विलंबाने धावणे, ही बाब नियमित झाली असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
याशिवाय मुरुड आगाराचा अधिकृत संपर्क क्रमांक गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांना चौकशी किंवा तक्रार नोंदविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे प्रशासनाशी संपर्क साधण्याचा मार्गच बंद झाल्याची भावना नागरिकांत आहे.
या पार्श्वभूमीवर ‘ग्रामीण पोलीस’ वृत्तपत्राचे संपादक खुशाल विसपुते यांनी अलिबाग येथे सूचना पुस्तकात अधिकृत तक्रार नोंदवली असून, मुरुड–कल्याण बस वेळेत सोडण्याबाबत आणि आगाराचा संपर्क क्रमांक तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
प्रवाशांनी एसटी प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे, तसेच संपर्क व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा प्रवाशांकडून देण्यात येत आहे.
