
®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : अनेक भागांत विविध कंपन्यांच्या नावाने “पैसे दुप्पट करून देतो”, “मनी डबल स्कीम”, “हमीने परतावा” अशा आमिषपूर्ण जाहिराती व आश्वासने देत नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सोशल मीडियावर, व्हॉट्सअॅप ग्रुपवर आणि स्थानिक पातळीवरील एजंटमार्फत लोकांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले जात असून काही दिवस परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर मोठी रक्कम उकळून कंपन्या गायब होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
फसवणूक झालेल्या अनेक नागरिकांनी पोलिसांकडे लेखी तक्रारी दिल्या असल्या तरी काही ठिकाणी तक्रारींवर तातडीने गुन्हा दाखल न होता विलंब होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पीडितांना न्याय मिळण्यात अडथळे येत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
नागरिकांनी पोलिस प्रशासनाला आवाहन केले आहे की, अशा “मनी डबल”च्या नावाखाली काम करणाऱ्या संशयित कंपन्या व व्यक्तींची वेळीच सखोल चौकशी करावी. फसवणूक झालेल्या व्यक्तींच्या लेखी अर्जांची तत्काळ दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. तसेच जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांना अशा योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन करावे.
दरम्यान, तज्ज्ञांचे मत आहे की, कोणतीही गुंतवणूक योजना जर कमी वेळात दुप्पट परतावा देण्याचे आश्वासन देत असेल, तर ती योजना संशयास्पद समजावी. अधिकृत नोंदणी, परवाने आणि विश्वासार्ह माहिती तपासल्याशिवाय कोणतीही रक्कम गुंतवू नये, असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.