
®अधिवेशन वृत्तसेवा, नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार Raghav Chadha यांनी संसदेत सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित मुद्दे उपस्थित करत बँक खात्यांवरील किमान शिल्लक (Minimum Balance) न ठेवल्यास आकारला जाणारा दंड तात्काळ रद्द करावा अशी जोरदार मागणी केली. त्यांनी सांगितले की अनेक बँका खात्यात किमान रक्कम न ठेवल्यास ₹50 ते ₹600 पर्यंत दंड आकारतात आणि त्यावर 18% GSTही आकारला जातो. याचा सर्वाधिक फटका गरीब, ग्रामीण आणि लहान खातेदारांना बसतो.
“सामान्य लोकांच्या पैशावर दंड का?”
राघव चड्ढा यांनी प्रश्न उपस्थित करत सांगितले की बँका विविध शुल्कांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या खात्यातून पैसे वसूल करतात. त्यामुळे बेसिक सेव्हिंग अकाउंटवर किमान बॅलन्स न ठेवल्याबद्दल कोणताही दंड आकारू नये अशी त्यांची मागणी आहे.
संसदेत मांडलेले इतर दोन मुद्दे
भाषणात त्यांनी आणखी दोन महत्त्वाच्या मागण्या मांडल्या—
- पती-पत्नीला संयुक्त आयकर रिटर्न (Joint ITR Filing) करण्याची परवानगी
- सेवेदरम्यान जखमी झालेल्या सैनिकांच्या दिव्यांगता पेन्शनला पूर्ण करमुक्ती
भाषण सोशल मीडियावर व्हायरल
बँकांच्या “hidden charges” आणि सामान्य नागरिकांवरील आर्थिक भार यावर त्यांनी केलेले भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून अनेकांनी या मागणीला समर्थन दिले आहे.