
®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका पालिका हद्दीतील कॅम्प 4 पूनम लॉज ते सूर्या लॉज तसेच विठ्ठलवाडी वाहतूक कार्यालय ते नरहरी सोनार चौक परिसरात वाहतूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर येत असून नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक प्रमुख रस्त्यांवर नो-हॉर्न, नो-पार्किंग, P1 आणि P2 पार्किंग दर्शक फलकांचा अभाव आहे. याशिवाय, अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर, दिशा-दर्शक फलक आणि झेब्रा क्रॉसिंगही नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक वृत्तपत्रांमध्ये वारंवार या समस्यांबाबत बातम्या प्रकाशित होत असूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिकांनी मुख्यमंत्री “आपले सरकार पोर्टल” वर तक्रारी नोंदवूनही 21 दिवसांनंतरही त्यांची दखल घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, उल्हासनगर महानगरपालिका चे अधिकारी तक्रारींकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करत असल्याचे चित्र दिसत आहे. “तक्रार तुमची, टाळाटाळ आमची” या उदान्त हेतूने संबधित अधिकारी कामे करत आहेत. शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांमुळे तातडीने उपाययोजना करून आवश्यक दिशा-दर्शक फलक, स्पीड ब्रेकर आणि झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.