
®अधिवेशन वृत्तसेवा, नवी दिल्ली : Press and Registration of Periodicals Act, 2023 अंतर्गत वार्षिक विवरणपत्र (Annual Statement) दीर्घकाळ सादर न करणाऱ्या नियतकालिकांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई केली आहे. प्रेस रजिस्ट्रार जनरल (PRGI) कार्यालयाने जारी केलेल्या सल्लागार सूचना क्र. 09/2026 नुसार, सलग 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वार्षिक विवरणपत्र न भरलेल्या अनेक नियतकालिकांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी 09 सप्टेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या सल्लागार सूचना क्र. 33/2025 मध्ये अशा नियतकालिकांना “Defunct Category” मध्ये वर्गीकृत करून त्यांच्या नोंदण्या तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आल्या होत्या. संबंधित प्रकाशकांना Publication Continuation Certificate सादर करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
मात्र, निर्धारित कालावधीत आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्या नियतकालिकांची नोंदणी आता अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. रद्द झालेल्या नियतकालिकांची यादी PRGI च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, ज्या प्रकाशकांनी 31 जानेवारी 2026 पूर्वी दंडासह आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत; मात्र त्यांचे नाव रद्द यादीत आले आहे, त्यांनी आवश्यक पुराव्यांसह Publication Continuation Certificate ई-मेलद्वारे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, रद्द करण्यात आलेली सर्व शीर्षके आता नव्याने नोंदणीसाठी खुली करण्यात आली असून, अशा शीर्षकांच्या पुनरुज्जीवनासाठी कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इच्छुक अर्जदारांनी “Press Sewa Portal” द्वारे नव्याने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.