
®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर, ३० जून : ठाणे पोलीस आयुक्तालयाने प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी व गतिमान करण्याच्या उद्देशाने केलेल्या बदल्यांमध्ये चंद्रहार गोडसे यांची विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी चंद्रहार गोडसे हे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. गुन्हे अन्वेषणाचा मोठा अनुभव आणि परिसराची सखोल माहिती असल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे विठ्ठलवाडी परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चंद्रहार गोडसे हे पोलिस विभागातील अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जातात. विविध महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असून, निर्णयक्षमता, शिस्तबद्ध कामकाज, कठोर परिश्रम आणि नागरिकांशी सुसंवाद राखण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर ‘ग्रामीण पोलीस’ पत्रकारांशी बोलताना चंद्रहार गोडसे म्हणाले, “विठ्ठलवाडी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, सीसीटीव्ही यंत्रणेच्या प्रभावी वापरातून गुन्हेगारीवर वेळीच आळा घालणे, नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्याने प्रतिसाद देणे आणि पोलिसांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे, हे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल. नागरिकांच्या सहकार्याने सुरक्षित, शांततापूर्ण आणि गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” दरम्यान, स्थानिक नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी चंद्रहार गोडसे यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि जनतेला न्याय देणारा ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.