केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

लातूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी लातूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित आंदोलनात आज राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख साहेब यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे माजी आमदार वैजनाथ शिंदे व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सहभाग घेतला. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोटार सायकल वरून निषेध रॅली काढण्यात आली. भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संसदेत चर्चा सुरू असताना ज्यांनी हे संविधान दिले त्या परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच संविधानिक पदावर म्हणजे केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असलेल्या अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्य करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे, आपल्या लोकशाही देशातील प्रत्येक नागरिकाला ही बाब कदापि सहन होणारी नाही. त्यामुळे त्यांना या पदापासून दूर करावे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाच्या राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Scroll to Top