®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर दि. 17 । राज्य सरकारचे बनावट ओळखपत्र दाखवून किराणा दुकानाची तपासणी करुन कारवाई न करण्यासाठी दोन लाखांची खंडणी मागणी करणार्या चार बोगस अधिकार्यांना दुकानदारांनी नागरिकांच्या मदतीने पकडले. तसेच मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिले. मध्यवर्ती पोलिसांनी या चारही बोगस अधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल केला. उल्हासनगर कॅम्प नं ३, पंजाबी कॉलनी येथे राजू नारायणदास कुकरेजा यांचे किराणा दुकान आहे. दि. 17 मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गळ्यात राज्य सरकारचे ओळखपत्र घालून चार जण सरकारी अधिकारी असल्याचे सांगून किराणा दुकानात शिरले. चौघांमध्ये दोन महिलांचा समावेश होता.
चौघांनी दुकानाची तपासणी सुरु केल्याने दुकानदार घाबरून गेला. त्यावेळी त्या चौघांनी तपासणी आणि कारवाई न करण्यासाठी दुकानदार कुकरेजा यांच्याकडे दोन लाखांची खंडणी मागितली. त्यांच्या हालचालींवर संशय आल्याने दुकानदाराने त्वरीत मध्यवर्ती पोलिसांना माहिती दिली त्यावेळी पळून जाण्याच्या बेतात असताना दुकानदाराने नागरिकांच्या मदतीने या चौघांना पकडले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी वैभव महादेव बागडे, संतोष पुरुषोत्तम पारकर, शुभदा सुनील विचारे आणि शिल्पा संदीप पालांडे या चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.