
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर (ठाणे, महाराष्ट्र) : उल्हासनगर कॅम्प-४, प्रभाग १५ महादेव नगर मध्ये AMRUT अभियानांतर्गत भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून, या कामाच्या पद्धतीबाबत स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या भागातील जुनी गटारे पूर्वी पावसाचे पाणी, सांडपाणी तसेच भटक्या प्राण्यांचे मलमूत्र वाहून नेण्याचे काम करत होती. सध्या ती गटारे तोडून नवीन भुयारी पाईपलाइनद्वारे सांडपाणी व्यवस्थापन (STP) उभारणीचे काम सुरू आहे.
रहिवाशांच्या मते, जुन्या गटाऱ्यांचे तोडकाम व नवीन पाईपलाइन टाकण्याचे काम अव्यवस्थित आणि चुकीच्या नियोजनाने केले जात आहे. यामुळे भविष्यात परिसरात सांडपाणी वाद, पाणी साचणे, दुर्गंधी, गळती तसेच पर्यावरणीय व आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात संबंधित कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग अधिकारी अशोक घुले (https://www.umc.gov.in/water-supply-department) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेचे स्वच्छता विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PUMC) यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिल्याचे रहिवाशांनी सांगितले.
रहिवाशांचे म्हणणे आहे की, तातडीने स्थळ पाहणी करून कामाची तांत्रिक तपासणी व योग्य उपाययोजना करण्यात यावी. अन्यथा या योजनेमुळे परिसरात पर्यावरण प्रदूषण आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
