घाण पाण्याला पूर्णविराम! पाणीपुरवठा विभागाची झटपट दखल

®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 15 मधील महादेव नगर, कॅम्प 4 येथे पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाइपलाइनच्या शेवटच्या टोकावर अनधिकृतपणे गोणी (कुंडी) व सिमेंट टाकून ती बंद करण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली होती. या प्रकारामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी गळती (लीकेज) होत होती. परिणामी परिसरातील नागरिकांच्या नळांमधून घाणेरडे व दूषित पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व चिंता व्यक्त होत होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित पाणीपुरवठा अधिकारी परमेश्वर बुडगे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मानकर व त्यांच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत घाण पाण्याची पाइपलाइन बंद केली तसेच मुख्य लाईनवरील अडथळा दूर करण्याची प्रक्रिया हाती घेतली.
या तात्काळ हस्तक्षेपामुळे नळांमधून येणारे दूषित पाणी थांबविण्यात यश आले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिसरातील रहिवाशांनी अधिकारी बुडगे व त्यांच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, भविष्यात अशा प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी संबंधित लाईनसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याचे चेंबर उभारण्यात यावे, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत राहण्यास मदत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

Scroll to Top