बदलापूरकरांचा एसी लोकल उशिराबद्दल संताप; रेल्वे प्रशासनाविरोधात तक्रार

®अधिवेशन वृत्तसेवा, बदलापूर : बदलापूर येथून दुपारी १:४८ वाजता सुटणारी एसी लोकल वारंवार उशिरा धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दररोज कामावर जाणाऱ्या आणि परतीच्या प्रवाशांचा यामुळे वेळेचा मोठा अपव्यय होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या बदलापूर येथील प्रवासी पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे सूचना व तक्रार पुस्तक क्रमांक 406228 नुसार लेखी तक्रार नोंदवली आहे. एसी लोकल वेळेवर धावावी आणि प्रवाशांना होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात महिलांकडून लघुशंकेसाठी पैसे घेतले जात असल्याच्या प्रकारावरून रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन केले होते. या घटनेवरून प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
बदलापूर परिसरात रेल्वे सेवा आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत वारंवार तक्रारी समोर येत असून, याकडे केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच प्रवाशांना वेळेवर सेवा व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही होत आहे. ★★★★★

Scroll to Top