विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीत CCTV गायब; नागरिकांकडून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी

®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आपले सरकार पोर्टलवर करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पेन्सील फॅक्टरी मागील रोड, सदगुरु नगर / बंजारा कॉलनी परिसरातील शिवसेना शाखेसमोर बसविण्यात आलेला CCTV कॅमेरा गेल्या अनेक महिन्यांपासून गायब असल्याचे समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून CCTV नसल्यामुळे परिसरातील सुरक्षेवर परिणाम होत असल्याचे सांगितले आहे. तसेच या भागात पोलीस गस्त (पेट्रोलिंग) वाढविण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
तक्रारीसोबत नागरिकांनी फोटो पुरावा म्हणून सादर केला असून प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पडताळणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित विभागाने लवकरात लवकर CCTV पुन्हा बसवून परिसरातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, तसेच नियमित पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या संदर्भात ‘ग्रामीण पोलीस’ वृत्तपत्राचे संपादक खुशाल अरविंद विसपुते यांनी आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून CCTV गायब असल्याबाबत तक्रार नोंदविली होती. त्यानुसार चौकशीसाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याकडून दिनांक 27 मे रोजी रात्री सुमारे 9:00 वाजता मेल प्राप्त झाला आहे.
त्यानंतर संबंधित अधिकारी दराडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून सदर प्रकरणात वरिष्ठांशी चर्चा करून CCTV प्रत्यक्षात गायब आहे किंवा नाही याची शहानिशा व पडताळणी करून लेखी स्वरूपात माहिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली. तसेच संबंधित मेलसोबत वरिष्ठांचे पत्र तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि उल्हासनगर महानगरपालिका नेमकी कोणती पावले उचलणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Scroll to Top