®अधिवेशन वृतसेवा ; आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये निसर्ग, पर्यावरण याबरोबरच मानवी आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक सुंदर उपदेश केलेले आढळतात. सतत बसून राहण्याची सवय असणार्यांना आपल्याकडे ‘जो धावतो त्याचे दैवही धावते, जो चालतो त्याचे दैवही चालत राहते आणि जो बसतो त्याचे दैवही बसकण मारते’ असे म्हणून व्यायामास प्रोत्साहन दिलेले आहे. मात्र सध्याच्या जीवनशैलीत अनेक लोकांना काहीही आणि कितीही खावून अनेक तास एकाच जागी बसून राहण्याची सवय असते. ही सवय धूम्रपानाइतकीच धोकादायक आहे. एका संशोधनात ही बाब स्पष्ट झाली आहे. अनेकदा गप्पा मारताना, कोणाची वाट बघताना आणि अगदी कार्यालयात देखील आपण दिवसभर कॉम्प्युटर समोर बसून असतो. ही बैठी जीवनशैली धोकादायक आहे.याबाबत ९ हजार लोकांवर एक प्रयोग करण्यात आला. त्यात असे दिसून आले की, एका तासाहून अधिक वेळ बसल्यास चयापचय क्रिया कमी होते. परिणामी कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणाबाहेर जाते. शोधात हाती आलेल्या माहितीनुसार, शारीरिक कष्ट कमी झाल्याने किंवा त्यातील अनियमिततेमुळे हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता ६ टक्के तर मधुमेहाचा धोका ७ टक्के आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका १० टक्क्यांनी वाढतो. ३.५ कोटी मृत्यूचे कारण स्थूलता असल्याचे यापूर्वी झालेल्या एका अमेरिकेच्या शोधातून दिसून आले होते. एका तासाहून अधिक वेळ टीव्ही बघितल्यास मृत्यूचा धोका ११ टक्के वाढतो, असेही दिसून आले आहे.