
®अधिवेशन वृतसेवा, मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात वाढदिवस किंवा तत्सम खासगी कार्यक्रम साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कार्यालयीन वेळेत अशा प्रकारचे कार्यक्रम साजरे केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शासकीय कार्यालयात काम करत असताना कर्मचाऱ्यांना स्वतःचा वाढदिवस कार्यालयात साजरा करता येणार नाही.
अनेकदा कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वाढदिवस त्यांच्याच कार्यालयात साजरा केला जातो. काही वेळा ही सेलिब्रेशन बराच वेळ चालते. वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेत बाहेर जेवायला जातात. केवळ वाढदिवसच नव्हे तर फेअरवेल पार्टी किंवा इतर खासगी स्वरूपाचे कार्यक्रमही शासकीय कार्यालयात साजरे केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
मात्र आता अशा सर्व कार्यक्रमांवर शासकीय कार्यालयात बंदी घालण्यात आली आहे. यापुढे कोणतेही खासगी कार्यक्रम शासकीय कार्यालयात साजरे केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 नुसार करण्यात येणार असून, यासंदर्भात शासनाकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.
अशा कार्यक्रमांमुळे कार्यालयीन वेळेचा अपव्यय होतो व शासकीय कामकाजात अडथळे निर्माण होतात, असे शासनाने स्पष्ट केले आहे. हा नियम राज्यातील सर्व शासकीय कार्यालये व कर्मचारी यांना बंधनकारक असणार आहे. उपाय म्हणून, असे कोणतेही कार्यक्रम साजरे करायचे असल्यास ते सुट्टीच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळ संपल्यानंतर करता येतील. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे.