
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : आरोपी अटक होईपर्यंत प्रकरणाचा पाठपुरावा, वेळेच्या चौकटी, कायदेशीर प्रक्रिया, वरिष्ठांचे आदेश, न्यायालयीन जबाबदाऱ्या आणि त्यातच बंदोबस्त, जनजागृती, आकस्मिक घटना—या सगळ्यांच्या ओझ्याखाली आजचा तपास अधिकारी (IO) अक्षरशः ताणाखाली काम करत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपी अटक होईपर्यंत प्रचंड पाठपुरावा करावा लागतो. 60 किंवा 90 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याची सक्ती, 14 दिवसांत चौकशी अर्ज, आरोपी अटक झाल्यानंतर BNSS प्रमाणे समक्ष नोटीस देणे, व्हॉट्सअॅ प किंवा अनधिकृत पद्धत वापरली तर illegal arrestचा धोका—या सर्व बाबी तपास अधिकाऱ्यांवर टांगती तलवार बनल्या आहेत.
अटक झाल्यानंतर आरोपीचे फिंगरप्रिंट Ambis प्रणालीवर घेणे, चार्जशीट CCTNS मध्ये वेळेत भरणे, सर्व पुरावे ई-साक्षमध्ये अपलोड करणे, महिला पीडितेचे तात्काळ मेडिकल, महिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात न बोलावणे, केस डायरी BNSS प्रमाणेच ठेवणे, पहिल्या चार दिवसांत सलग तपास पूर्ण करणे—या सगळ्या जबाबदाऱ्या वेळेच्या बंधनात पूर्ण कराव्या लागतात. याशिवाय, आरोपी कोठडीत असताना मारहाण होऊ नये याची काळजी, चार्जशीट दाखल करण्यास १० दिवस शिल्लक असतानाच नोटिंग वरिष्ठांकडे पोहोचवणे, तपासासाठी बाहेरगावी गेल्यास कोणाकडूनही आर्थिक मदत न मागणे, अन्यथा तक्रारींचा मनस्ताप वेगळाच. तपासादरम्यान बंदोबस्त, महत्त्वाचे कार्यक्रम, दंगलीची शक्यता, निवडणूक आचारसंहिता अशा प्रसंगी IO ची अक्षरशः धावपळ होते. दररोज MCU साठी आरोपी पाठवणे, जेल रिलीज हजर करणे, डोजियर भरणे, चार्जशीटपूर्वी व चार्जशीट दाखल करताना सरकारी वकील, कोर्ट कारकून, FSL, पंच यांची वेगवेगळी प्रक्रिया पार पाडावी लागते.
वरिष्ठ आदेशांनुसार प्रत्येक गुन्ह्यात फॉरेन्सिक व्हॅन, तात्काळ घटनास्थळी पोहोचणे, वरिष्ठांना माहिती, पोलीस दीदी–काका बैठक, शांतता समिती, मोहल्ला समिती, कॉर्नर मीटिंग, ऑपरेशन थंडर, जनजागृती, बाजारात मेगाफोन घेऊन घोषणा, पायदळ पेट्रोलिंग, सेल्फी व लोकेशन पाठवणे, दिवसातून चार वेळा ग्रुप कॉल—हे सर्व नियमित झाले आहे. इतकेच नव्हे तर बिबट्या पकडण्याची धावपळ, भिकारी/बेगर कारवाई, मिसिंग व्यक्ती शोध, हॉकर्स कारवाई, पोस्टर-बॅनर काढणे, आकडेवारीसाठी खोट्या केसेस दाखवण्याचा अप्रत्यक्ष दबाव आणि कधी कधी बेकायदेशीर आदेशांचे पालन—या सगळ्यांचा मानसिक ताण पोलिसांवर सतत वाढत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये तणाव, उच्च रक्तदाब, नैराश्य आणि हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. मात्र तरीही, व्यवस्थात्मक सुधारणा, मनुष्यबळ वाढ आणि कामाच्या वेळेचे संतुलन याकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
मग प्रश्न एकच उरतो इतक्या जबाबदाऱ्या, इतका ताण आणि सततची धावपळ असताना पोलिसांना हार्ट अटॅक का येतात, याचे उत्तर शोधण्याची वेळ आता आली नाही का?