
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : देशातील रेल्वे प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचे साधन नसून, तो आपल्या सामाजिक संस्कारांचा आणि सार्वजनिक शिस्तीचा आरसा मानला जातो. मात्र, अलीकडच्या काळात या आरशात दिसणारी प्रतिमा अधिकच चिंताजनक ठरत आहे. रेल्वेमधील वाढते असभ्य वर्तन प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सह-प्रवाशांच्या सोयीसुविधांवरही गंभीर परिणाम करत असल्याचे चित्र समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाच्या नोंदी आणि प्रवाशांच्या अनुभवांनुसार, लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये गैरवर्तनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गर्दीच्या लोकल किंवा बसमध्ये ढकलाढकली, आरक्षित आसनांवर तरुण प्रवाशांनी बसणे, वृद्ध व गर्भवती महिलांना उभे राहण्यास भाग पाडले जाणे, तसेच कानात इअरफोन घालून मोबाईलमध्ये गुंतलेली, आजूबाजूच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणारी चेहरे—हे चित्र आता नेहमीचेच झाले आहे. अशा प्रसंगांमुळे प्रवासाचा अनुभव अस्वस्थ करणारा ठरत आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे दिव्यांग डब्यांमध्ये गैर-प्रवाशांची गर्दी, स्टेशन ब्रिज आणि डब्यांच्या दरवाज्याजवळ अनधिकृतरीत्या उभे राहणे, मोठ्याने आरडाओरड, सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ आणि अश्लील हावभाव या घटना सर्रास घडत आहेत. काही ठिकाणी चालत्या ट्रेनमध्ये गांजाचे सेवन, प्रवाशांना गटाने भीती दाखवणे आणि भाषा-विवाद घडवून आणण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात धोकादायक बाब म्हणजे काही मार्गांवर चालत्या ट्रेनवर दगडफेक झाल्याच्या घटना. या प्रकारांमुळे सामान्य प्रवाशांच्या जीवितास थेट धोका निर्माण होत असून, मुलांसह कुटुंबांनी रेल्वेप्रवास करणेही असुरक्षित वाटू लागले आहे.
रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि शासकीय रेल्वे पोलिस (GRP) वेळोवेळी विशेष मोहीमा राबवत असले तरी, तज्ज्ञांच्या मते ही समस्या केवळ सुरक्षा यंत्रणांची नसून सामाजिक शिस्त, जबाबदारी आणि सार्वजनिक संस्कारांच्या ढासळलेल्या पातळीशी निगडित आहे. दररोज दोन कोटींपेक्षा अधिक नागरिकांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी आहे. मात्र या यंत्रणेचे सुरळीत आणि सुरक्षित संचालन केवळ प्रशासनावर नव्हे, तर प्रवाशांच्या वर्तनावरही अवलंबून आहे. काही प्रवाशांच्या असभ्य वागणुकीमुळे परस्पर आदर, सहानुभूती आणि सामाजिक संस्कृतीची मूल्ये धूसर होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एक प्रश्न अधिक ठळकपणे उपस्थित होत आहे—रेल्वेमध्ये शिस्त लावण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? प्रशासनाची, की प्रवाशांनी स्वतःहून सामाजिक भान आणि जबाबदारी स्वीकारण्याची? उत्तर शोधणे जितके आवश्यक आहे, तितकेच शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत प्रवासासाठी सामूहिक प्रयत्न करणेही आज काळाची गरज बनली आहे.