मतदानाच्या दिवशी मतदारांना भरपगारी सुट्टी देण्याबाबत शासनाचा स्पष्ट आदेश

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी मतदानाच्या दिवशी सर्व पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शासनाने भरपगारी सुट्टी अथवा कामाच्या तासात योग्य सवलत देण्याचे आदेश दिले आहेत.
आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून १८ वर्षांवरील नोंदणीकृत प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना भरपगारी सुट्टी देणे किंवा आवश्यक ती कामाच्या वेळेत सवलत देणे बंधनकारक आहे.
मात्र, मागील काही निवडणुकांमध्ये असे निदर्शनास आले आहे की काही संस्था, आस्थापना व उद्योगधंदे आपल्या कामगारांना ना भरपगारी सुट्टी देत आहेत, ना वेळेची सवलत, त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहत आहेत. ही बाब लोकशाही प्रक्रियेस अत्यंत घातक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व मतदारांना निर्बंधाविना मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांतील मतदारांनाही मतदानाची संधी मिळावी, यासाठी शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.
सदर आदेश राज्य निवडणूक आयोगाच्या दि. १५ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत निर्गमित पत्रांच्या अनुषंगाने तसेच दि. ३० डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन परिपत्रक क्रमांक
संकीर्ण २०२५/प्र.क्र. २००/कामगार–९ नुसार लागू करण्यात आले आहेत.
शासनाने सर्व नियोक्ता, संस्था, आस्थापना व उद्योगांना या आदेशाचे कठोर पालन करण्याचे निर्देश दिले असून उल्लंघन झाल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Scroll to Top