
®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : शहरातील मेडिकल, हॉस्पिटल, बँका आदी ठिकाणी आपत्कालीन व महत्त्वाच्या कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना पार्किंगच्या समस्येमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. P1, P2 तसेच ‘नो पार्किंग’ संदर्भातील स्पष्ट सूचना फलक नसल्याने वाहनधारकांना वाहतूक विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागत असून, दंडाची झळ बसत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, संबंधित ठिकाणी कोणतेही मार्गदर्शक फलक नसल्यामुळे वाहन कुठे उभे करावे याबाबत संभ्रम निर्माण होतो. परिणामी, अनेकांना अनवधानाने चुकीच्या ठिकाणी वाहन उभे केल्याबद्दल चलन भरावे लागते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात धाव घेणाऱ्या कुटुंबीयांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून संबंधित महानगरपालिकेला लेखी सूचना द्याव्यात व योग्य त्या ठिकाणी P1, P2 तसेच ‘नो पार्किंग’ फलक तातडीने लावण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनावश्यक दंडापासून दिलासा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
तर दुसरीकडे उल्हासनगर शहरात नुकताच सुमारे ₹23 कोटी खर्चून उभारलेला महत्त्वाचा रस्ता देखील अवैध पार्किंगमुळे अंशतः बंदिस्त झाला आहे. ट्रक आणि इतर जड वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्याचा जवळपास ५० टक्के भाग अडथळित होत असून, वाहतुकीची कोंडी वाढत आहे. स्थानिक रहिवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नव्याने बांधलेला रस्ता वाहतुकीसाठी मोकळा राहावा, यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी व अवैध पार्किंगवर तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांच्या वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.