उल्हासनगरमध्ये धडक देऊन फरार; १७ वर्षीय धावपटू जखमी

®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : व्ही.टी.सी. ग्राउंड परिसरात सकाळी रनिंग प्रॅक्टिसदरम्यान अज्ञात स्कुटीस्वाराने धडक देऊन पळ काढल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात १७ वर्षीय तरुण जखमी झाला असून त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता व्ही.टी.सी. ग्राउंडकडे जात असताना धगटा कंपनीच्या गेटसमोर मानेरे रोडवरून येणाऱ्या अज्ञात स्कुटीस्वाराने तरुणाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर स्कुटीस्वाराने मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. जखमी तरुणाला तात्काळ मोहात्रा हॉस्पिटल, उल्हासनगर-३ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपासणीत त्याच्या डाव्या पायाच्या नडगीला फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0077/2026 नोंद करण्यात आला आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम 134 (अ), 134 (ब), 184 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 125 (अ), 125 (ब) आणि 281 अन्वये अज्ञात स्कुटीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार हरीशचंद्र महादू घाणे (ब.क्र. 6319) करत आहेत. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Scroll to Top