उल्हासनगरात लोकअदालत; प्रलंबित ई-चलन दंड तडजोडीने निकाली काढण्याची संधी

®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलवाडी वाहतूक उपविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे. वाहनांवर प्रलंबित असलेले वाहतूक नियमभंगासंदर्भातील ई-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ज्या वाहनचालकांवर ई-चलनद्वारे दंड प्रलंबित आहेत, त्यांनी दंड कमी करण्यासाठी व खटले दाखल करून निकाली काढण्यासाठी विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग, उल्हासनगर कॅम्प-4 येथील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर खटले दिनांक 26 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. संबंधित नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन प्रलंबित दंड प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

Scroll to Top