
®अधिवेशन वृत्तसेवा,उल्हासनगर : शहरात मागील सहा महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. छोट्या-छोट्या कारणांवरून भरदिवसा जीवघेणे हल्ले करणे, वाहनांची तोडफोड करणे, दुकानात घुसून मारहाण करणे, पूर्ववैमनस्यातून हल्ले करणे, बेल्टने मारहाण करणे, तसेच कौटुंबिक वाद आणि पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना घडत असल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील काही भागांत किरकोळ वादही थेट हिंसाचारात बदलत असल्याचे अनेक घटनांतून समोर आले आहे. वाहनांची तोडफोड, व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये घुसून मारहाण करणे आणि नागरिकांना धमकावणे अशा प्रकारांमुळे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने परिस्थिती गांभीर्याने घेऊन शहरात गस्त (पेट्रोलिंग) वाढवणे, गुन्ह्यांची तात्काळ नोंद करणे, लेखी तक्रारींवर तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गुन्ह्यांकडे दुर्लक्ष न करता प्रत्येक प्रकरण गांभीर्याने हाताळून पीडितांना योग्य तो न्याय मिळवून देणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.
समाजाची निकोप वाढ आणि शहराच्या विकासासाठी भयमुक्त वातावरण निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था कडकपणे राखत गुन्हेगारीला आळा घालणे, संघटित गुन्हेगारी आणि असामाजिक तत्वांवर कठोर कारवाई करणे तसेच दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच रोखणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.