विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांची संवाद बैठक

®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी विशेष संवाद बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक दिनांक 23 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत पार पडली. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांच्या 26 फेब्रुवारी 2026 च्या पत्राच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली होती. बैठकीचे आयोजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या बैठकीस परिमंडळ-4 चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे तसेच उल्हासनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी उपस्थित होते. बैठकीत सुमारे 5 अधिकारी व 50 अंमलदार (पुरुष व महिला) सहभागी झाले होते.
बैठकीदरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी, आव्हाने आणि सुधारणा उपाय यावर चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांवर मार्गदर्शन करत पोलीस कामकाज अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख कसे करता येईल याबाबत सूचना दिल्या. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांमधील समन्वय वाढवणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि तणावमुक्त वातावरणात काम करण्यास प्रोत्साहन देणे हा होता. कार्यक्रम आनंदी वातावरणात संपन्न झाला.

Scroll to Top