मानवी सेवेला प्राधान्य; डॉ. मनोहर बनसोडे यांची रुग्णांसाठी अहोरात्र धडपड

®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर (जि. ठाणे) : सिव्हिल सर्जन म्हणून कार्यरत असलेले डॉ. मनोहर बनसोडे हे वैद्यकीय सेवेला केवळ व्यवसाय न मानता मानवी कल्याणासाठी अहोरात्र झटणारे अधिकारी म्हणून ओळखले जात आहेत. रुग्णांच्या अडचणींना तातडीने प्रतिसाद देत, संबंधित डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना देणे, तपासण्यांची अचूकता राखणे आणि उपचार प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर त्यांचा विशेष भर असतो. रुग्णालयात सीटी स्कॅन बंद असल्यास तातडीने संबंधित विभागाला कळवणे, रक्त नमुन्यांची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश देणे, तसेच अभा कार्ड, नोंदणी व स्वच्छतेसारख्या बाबींवर काटेकोर लक्ष ठेवणे, या त्यांच्या कामकाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत. आवश्यकतेनुसार पीडब्ल्यूडी विभागाला बोलावून दुरुस्ती कामांवर देखील ते स्वतः लक्ष ठेवतात.
डॉ. बनसोडे हे व्हिडिओ कॉन्फरन्समध्येही तासन्‌तास सहभागी होत गंभीरतेने नोंदी घेतात. कठीण परिस्थितीत रुग्णांना तातडीने ॲडमिट करता येत नसल्यास, शासनाच्या नियमांनुसार उपाय शोधण्यासाठी ते आरएमओंना मार्गदर्शन करतात. यासोबतच आमदार, नगरसेवक व पत्रकारांशी समन्वय साधत त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असतात. कार्यालयीन कामकाजात शिस्त राखण्यासाठी ते अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार समज देतात, तर रुग्णांना न्याय मिळावा यासाठी कठोर भूमिका घेतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांना आवश्यक प्रमाणपत्रे देण्यासही ते तत्पर असतात. आजच्या काळात काही खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असताना, डॉ. मनोहर बनसोडे यांसारखे सेवाभावी अधिकारी समाजासाठी आदर्श ठरत आहेत.

Scroll to Top