
®अधिवेशन वृत्तसेवा, कल्याण : कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली तात्काळ सुरू करण्याचे आदेश पंचायत समिती प्रशासनाने दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विशाल शांताराम कुरकुटे यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, अनेक ग्रामपंचायतींमध्ये अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याच्या तसेच नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सतत प्राप्त होत होत्या. काही ठिकाणी कर्मचारी उशिरा येणे किंवा कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणे यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याचे आदेश दिले असून तिची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, याबाबत ढिलाई आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे ग्रामपंचायत स्तरावर शिस्त व पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.