उल्हासनगर महापालिकेची ऑनलाइन तक्रार निवारण सेवा सुरू

®अधिवेशन वृत्तसेवा, उल्हासनगर : नागरिकांच्या तक्रारींचे जलद व पारदर्शक निवारण करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने ऑनलाइन तक्रार नोंदणी सुविधा सुरू केली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना आता घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून तक्रार नोंदवणे सुलभ झाले आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, नागरिक QR कोड स्कॅन करून किंवा 84462 42043 या WhatsApp क्रमांकावर “Hi” असा संदेश पाठवून तक्रार नोंदवू शकतात. या सुविधेद्वारे रस्त्यांवरील खड्डे, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, बंद स्ट्रीटलाइट्स यांसारख्या विविध नागरी समस्यांची नोंद करता येणार आहे.
नोंदवलेल्या तक्रारी संबंधित विभागाकडे त्वरित पाठवण्यात येणार असून त्यावर ठराविक कालावधीत कार्यवाही केली जाणार आहे. या प्रणालीमुळे नागरिक व प्रशासन यांच्यातील संवाद अधिक सुलभ होणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. महापालिकेने नागरिकांना या सुविधेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Scroll to Top