उल्हासनगरची पावसापूर्वीची तयारी फोल? सोशल मीडियापासून राष्ट्रीय माध्यमांपर्यंत शहरातील परिस्थितीची चर्चा

®अधिवेशन वृतसेवा; उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये मान्सूनपूर्व विकासकामे, नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, जलनिस्सारण व्यवस्था आणि विविध भुयारी योजनांवर मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र पावसाच्या आगमनानंतर शहरातील अनेक भागांमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळाल्याने प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहरात काही विकासकामे पूर्ण झाली असली तरी अनेक ठिकाणी ती अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही भागांमध्ये नालेसफाई करण्यात आली, तर अनेक ठिकाणी ती अपूर्ण राहिल्याचा आरोप होत आहे. मान्सूनपूर्व पाहणी अनेक ठिकाणी करण्यात आली, मात्र काही समस्याग्रस्त भागांकडे दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
मुसळधार पावसानंतर अनेक भागांमध्ये पाणी साचले, काही परिसर जलमय झाले, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. आपत्कालीन परिस्थितीसाठी विविध विभागांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले होते. मात्र काही नागरिकांनी हे क्रमांक वेळेवर लागत नसल्याची तक्रार केली. काही ठिकाणी प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने मदत केली, तर काही भागांमध्ये मदत पोहोचण्यास विलंब झाल्याच्याही तक्रारी समोर आल्या.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी विविध विकासकामे, भुयारी गटार योजना, नालेसफाई, पाहण्या, बैठका आणि नियोजनाची घोषणा केली जाते. मात्र प्रत्यक्ष पावसाळ्यात अनेक समस्या पुन्हा समोर येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. “दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘ये रे माझ्या मागल्या’; योजना आल्या, कामांचे दावे झाले, पण परिस्थिती मात्र ‘जैसे थे’च राहिली,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहरातील विविध भागांतील पाणी साचल्याचे व्हिडिओ, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच काही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनीही उल्हासनगरमधील पावसाळी परिस्थिती आणि नागरिकांच्या अडचणींवर वृत्तांकन केल्याने हा विषय राज्यासह देशभरात चर्चेचा ठरला आहे. नागरिकांनी आता केवळ घोषणा आणि पाहण्या नकोत, तर कायमस्वरूपी उपाययोजना, कामांची गुणवत्ता, जबाबदारी निश्चित करणे आणि वेळेत मदत मिळेल अशी सक्षम यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे.

Scroll to Top