ॲड. सरिता खानचंदानी आत्महत्या प्रकरण: पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक खुलासे उघड

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर परिमंडल 4, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे च्या हदीत आठ दिवसापूर्वी उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील पाण्याच्या टाकी मागे रोमा अपार्टमेंट या बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरून सामाजिक कार्यकर्त्या व वकील सरिता खानचंदानी यांनी उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांनी अचानक केलेल्या या आत्महत्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या आत्महत्या मागे अनेक तर्कवितर्क काढले जात होते. त्यात सरिता खानचनांनी यांचे पती पुरुषोत्तम खानचंदानी यांनी उबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह चार जणांविरुद्ध संशय व्यक्त करीत त्यांनीच माझी पत्नी सरिता खानचंदांनी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे शहरात अधिकच खळबळ उडाली होती. अखेर सरिता खानचंदांनी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून व पुरुषोत्तम खानचंदानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धनंजय बोडारे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास सामाजिक कार्यकर्त्या व वकील सरिता खानचंदानी यांनी रोमा अपार्टमेंट या बिल्डिंगच्या सातव्या माळ्यावरून उडी घेतली होती. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना प्रथम उपचारासाठी रिक्षाने आशीर्वाद हॉस्पिटल व नंतर बालाजी हॉस्पिटल येथे नेण्यात आले होते. पण सरिता यांची प्रकृती खूपच चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने मॅक्सि लाइफ इथे नेण्यात आले होते. पण प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना एम्स हॉस्पिटल डोंबिवली येथे ऍडमिट करण्यात आले होते.
त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. सरिता खानचंदानी यांनी आत्महत्या का केली याबाबत सर्वत्र शहरात एकच चर्चेचा विषय ठरत होता. त्यात सरिता खानचंदानी यांचे पती पुरुषोत्तम खानचंदानी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सरिता खानचंदानी यांच्या मृत्यू बाबत संशय व्यक्त केला होता. याशिवाय त्यांना काही जणांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याशिवाय घटनेच्या आदल्या दिवशी मध्यरात्री सरिता खानचंदानी यांचे अशील जिया गोपलानी यांच्यासोबत वाद झाला होता. त्यावेळी तिच्या घरासमोर उल्हास फाळके व काहीजण हजर होते. याशिवाय जया हिने सरिता खानचंदानी यांच्या विरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सकाळी ११.३० च्या समोर सरिता या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातही गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी येऊन रोमा अपार्टमेंट मध्ये असलेल्या ऑफिसमध्ये बसून डायरीमध्ये काहीतरी लिहून ठेवले व त्यानंतर त्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर उडी घेऊन आत्महत्या केली. पुरुषोत्तम यांनी ऑफिस मधले सीसीटीव्ही चेक केले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार समजला. याशिवाय सरिता खानचंदानी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एका डायरीमध्ये सोसायटी नोट लिहून ठेवले असल्याचे दिसून आले. त्यात सरिता यांनी धनंजय बोडारे यांच्यासह जिया गोपलानी, उल्हास फालके ,शिवानी, राज अशा पाच जणांची नावे लिहून ठेवले असल्याचे पुरुषोत्तम खानचंदानी यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ती लिहिलेले चिठ्ठी ताब्यात घेतले असल्याचेही सांगण्यात आले असून. त्यावरून सरिता खानचंदानी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी करीत आहेत.

Scroll to Top