
®अधिवेशन वृतसेवा, ठाणे | 06-07 सप्टेंबर 2025 — ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत दिनांक 6 व 7 सप्टेंबर 2025 रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे नागरिकांच्या समस्या थेट ऐकून तात्काळ निराकरण करण्यात आले. या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी एकूण 376 अर्जदारांना बोलावण्यात आले होते, त्यापैकी 238 अर्जदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच इतर अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान एकूण 202 तक्रारींचे तात्काळ निराकरण अर्जदारांच्या समक्ष करण्यात आले. उर्वरित अर्जांसाठीही लवकरच संबंधित अर्जदारांना बोलावून त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येणार आहे. ठाणे शहर पोलीसांनी या उपक्रमाद्वारे नागरिकांच्या तक्रारींवर जागेवरच कारवाई केली. त्यामुळे उपस्थित अर्जदार व नागरिकांनी समाधान व्यक्त करून पोलीस विभागाचे विशेष आभार मानले. ठाणे पोलीसांचे हे नागरिकाभिमुख पाऊल कौतुकास्पद ठरत आहे.