
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : राज्यातील शिधावाटप योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना सध्या ई-केवायसीच्या अडचणींमुळे अन्नधान्यापासून जेष्ठ नागरिक, दिव्यांगाना वंचित राहावे लागत आहे. वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी, आधार प्रमाणीकरणातील अडथळे आणि अपूर्ण केवायसी प्रक्रियेमुळे शिधा वाटपात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
लाभार्थ्यांची केवायसी वेळेवर पूर्ण न झाल्यास किंवा यंत्रणेत तांत्रिक बिघाड आल्यास शिधा वाटप थांबत असून, अनेक वेळा गरजू कुटुंबांना उपासमारीची वेळ येते. काही ठिकाणी लाभार्थ्यांनी वेळेत केवायसी पूर्ण करूनही, सिस्टीममध्ये अपडेट न झाल्याने त्यांना धान्य मिळत नाहीये.
या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचे मत आहे की, शासनाने ई-केवायसी प्रक्रियेसाठी अधिक सुगम आणि वापरकर्ता-मैत्रीपूर्ण उपाय योजावेत. तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांसाठी मोबाईल किंवा ऑनलाईन पद्धतीबरोबरच ऑफलाइन पर्यायही उपलब्ध करून द्यावेत. केवायसी अडचणीमुळे कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक प्रतिनिधींनी देखील या समस्येकडे लक्ष वेधत शासनाला निवेदन देण्यास सुरुवात केली आहे. लाभार्थ्यांचे हक्काचे धान्य वेळेत मिळावे, यासाठी प्रशासन आणि शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता तीव्र होत आहे.