भारत-अमेरिका कराराविरोधात काँग्रेसचा इशारा – प्रणिती शिंदे

®अधिवेशन वृत्तसेवा, नवी दिल्ली : संसद भवन परिसरात सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. या करारामुळे देशातील शेतकरी आणि टेक्सटाइल्स उद्योगाचे मोठे नुकसान होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. खासदार शिंदे म्हणाल्या की, अमेरिका-भारत व्यापार करारामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच इतर शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “देशात उत्पादित होणाऱ्या शेतीमालाचे काय होणार? बळीराजाच्या कष्टाला योग्य मोबदला कसा मिळणार?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
“हा करार म्हणजे शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्यासारखा आहे. बळीराजाचे बळी घेण्याचे षडयंत्र सत्ताधारी सरकार राबवत आहे,” असा आरोप त्यांनी केला. सोलापूरसह महाराष्ट्रातील टेक्सटाइल्स उद्योग आधीच अडचणीत असताना या करारामुळे स्थानिक उद्योगांना मोठा फटका बसू शकतो आणि लाखो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर Indian National Congress देशातील शेतकरी, कामगार आणि लघुउद्योगांच्या हितासाठी मोठी लढाई उभी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “देशहिताच्या नावाखाली जनविरोधी निर्णय घेणे थांबवावे. हा भारत-अमेरिका व्यापार करार शेतकरी आणि उद्योगविरोधी असल्याने तो रद्द केला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, “हा करार करण्यामागे नेमका कोणाचा दबाव होता? देशहितापेक्षा इतर कोणते स्वार्थ पुढे होते का?” असे सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्यावरही थेट निशाणा साधला.
काँग्रेस पक्ष शेतकरी आणि उद्योगांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा देत खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला आवाहन केले.

Scroll to Top