
®अधिवेशन वृत्तसेवा, मुंबई : मुंबई येथील कफ परेड पोलीस ठाण्यातील कथित गैरवर्तनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका महिलेने पोलीस ठाण्यातील अनुभव सांगत पोलिसांच्या कामकाजावर गंभीर आरोप केले आहेत.
माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरील the_pana_3042 या खात्यावरून संबंधित व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तक्रारदार महिलेने सांगितले की, तक्रार नोंदवण्यासाठी तिला तासन्तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले जाते. पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ काढूनही अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप तिने केला आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्ती तिच्यासमोरच जीवे मारण्याच्या धमक्या देत असतानाही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. तसेच पोलिसांकडून पूर्ण तक्रार नोंदवण्याऐवजी अर्धवट एनसी (NC) घेतली जाते आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला जातो, असेही तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही अनेकदा कारवाई होत नसल्याचा आरोपही संबंधित महिलेने केला आहे. “आमच्या करातून पगार घेऊनही पोलीस काम करत नाहीत,” अशी नाराजी तिने व्यक्त केली.दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी काही नागरिकांकडून केली जात आहे. अधिकृत स्तरावर अद्याप याबाबत प्रतिक्रिया मिळालेली नाही. संबधित वारिष्ट पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड, व. पो. नि., कफ परेड पोलीस ठाणे, ८९७६९४७१६४ यांना फोन केला असता त्यांनी फोन उचला नाही.