
®अधिवेशन वृत्तसेवा, जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी वाहनांवर अशोक स्तंभाचा अनधिकृत वापर करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते श्री. दीपकुमार गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या निवेदनात काही वाहनांवर अशोक स्तंभ लावून त्याचा गैरवापर होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
भारत सरकारच्या State Emblem of India (Prohibition of Improper Use) Act, 2005 तसेच State Emblem of India (Regulation of Use) Rules, 2007 नुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, न्यायमूर्ती आदी विशिष्ट पदाधिकाऱ्यांनाच अधिकृत वाहनांवर अशोक स्तंभ वापरण्याची परवानगी आहे. खासगी व्यक्ती, माजी पदाधिकारी किंवा इतर कोणालाही हा चिन्ह वापरण्याची परवानगी नाही.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव यांना पत्र पाठवून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, राष्ट्रीय प्रतीकांचा वापर हा केवळ अधिकृत व्यक्तींनाच करता येतो. अनधिकृत वापर हा कायद्याचा भंग मानला जातो. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या कारवाईमुळे वाहनांवर अशोक स्तंभ लावणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याचे संकेत मिळत आहेत.