
®अधिवेशन वृत्तसेवा, ठाणे : सन २०१४ मध्ये डोंबिवली परिसरात घडलेल्या अपहरण व खून प्रकरणाचा तपास तब्बल १२ वर्षांनंतर उकलण्यात कल्याण गुन्हे शाखा (युनिट-३) ला यश आले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद बागुल (वय २३, रा. डोंबिवली) यांचे २०१४ मध्ये अपहरण झाले होते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४०/२०१४ भा.दं.वि. कलम ३६५ अन्वये नोंद करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी चंद्रकांत बाळाराम गायकवाड (वय ३९) याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत उघड झाले की, आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५५) याने ४ ऑक्टोबर २०१४ रोजी अरविंद बागुल यांचे अपहरण केले. त्यांना डोंबिवलीतील एका कार्यालयात नेऊन लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला.
खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कारमधून मुरबाड तालुक्यातील घनदाट जंगलात नेऊन टाकला. त्यावेळी मुरबाड पोलीस ठाण्यात अज्ञात मृतदेहाची नोंद झाली होती. तपासादरम्यान त्या मृतदेहाची ओळख अरविंद बागुल अशी पटली. या प्रकरणात भा.दं.वि. कलम ३०२ (खून), २०१ (पुरावा नष्ट करणे) आणि ३४ (सामूहिक हेतू) यांची भर घालण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुरेंद्र पाटील, चंद्रकांत गायकवाड आणि सुरेश उर्फ छोटू (वय ३२) यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी सुरेंद्र पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्त मा. श्री. आशीष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. श्री. पंजावराव उगले, पोलीस उपायुक्त (गुन्हे) मा. श्री. अमरसिंह जाधव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) मा. श्री. शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजीत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतेज पाटील, बळवंत भराडे, पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, दत्ताराम भोसेले, बालाजी शिंदे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. या पथकाच्या समन्वयातून आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे १२ वर्षांपूर्वीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले असून पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू आहे.