
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : पोलीस ठाण्यात तक्रारी घेण्यास विलंब होणे, तसेच समाधानकारक उत्तर न मिळणे यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी नकारात्मक भावना निर्माण होत असल्याचे दिसून येते. ही प्रतिमा बदलण्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक व्हावे, असे मत ‘ग्रामीण पोलीस’ वृत्तपत्राचे मुख्य संपादक खुशाल अरविंद विसपुते यांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १७ जून २०१६ रोजीच्या परिपत्रकानुसार, पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घ्याव्यात, त्यांचे वेळेत निराकरण करावे, तसेच तक्रारदारास सन्मानाने वागवावे. खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या तक्रारी देणाऱ्यांविरोधातही तात्काळ कारवाई केली जावी, अशी तरतूद परिपत्रकात आहे.
सदर शासन निर्णय क्रमांक एमआयएस २०१६/प्र.क्र. ९७/पोल ११ नुसार, नागरिकाकडून आलेल्या लेखी, ऑनलाईन किंवा ई-मेल अर्जाची २१ दिवसांच्या आत कार्यवाही करून अहवाल सादर करणे पोलीस प्रशासनासाठी बंधनकारक आहे.
विसपुते यांनी यावेळी असेही नमूद केले की, पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक तक्रारदाराशी सौजन्यपूर्ण वागणूक ठेवावी. त्यांच्या भावना समजून घ्याव्यात, सहानुभूतीपूर्वक संवाद साधावा. तक्रारदार आपल्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखा विचार करून त्याला योग्य मार्गदर्शन करावे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कडक भूमिका घ्यावी.
“पोलीस स्टेशन आणि दवाखाना ही दोनच ठिकाणं आहेत जिथे नागरिक नाईलाजाने आणि दुःखाने जातात. त्यामुळे पोलिसांनी आपल्या वर्तनातूनच नागरिकांना मानसिक आधार द्यावा,” असेही भावनिक आवाहन त्यांनी केले. ★★★