
उल्हासनगर : उल्हासनगर शहर वाहतूक उपविभागाच्या हद्दीतील नेहरू चौक परिसरात लावण्यात आलेला ‘नो एंट्री’ फलक झाडांच्या फांद्या व जाहिरात फलकांमुळे पूर्णपणे लपलेला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मार्गदर्शन मिळत नसून वारंवार वाहतूक कोंडी व वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
नेहरू चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर असून येथे दररोज हजारो वाहने ये-जा करतात. मात्र ‘नो एंट्री’ बोर्ड स्पष्टपणे न दिसल्याने अनेक वाहनचालक अनावधानाने प्रवेश करतात. परिणामी वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक वाहनचालकांचे म्हणणे आहे की, फलक लपलेला असताना दंडात्मक कारवाई करणे अन्यायकारक आहे. संबंधित विभागाने तातडीने फलक स्वच्छ, स्पष्ट व योग्य उंचीवर लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या संदर्भात वाहतूक पोलिस प्रशासनाने नेहरू चौकातील सर्व वाहतूक सूचनाफलकांची पाहणी करून आवश्यक सुधारणा कराव्यात, अन्यथा भविष्यात अपघातांची शक्यता नाकारता येत नाही, अशीही प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.