बससेवा सुरू; पण बसथांबे अद्याप असुविधांनी ग्रस्त

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेची स्वतःची परिवहन बससेवा तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली असली, तरी शहरातील अनेक बसथांबे आजही मूलभूत सुविधांअभावी त्रस्त असल्याचे चित्र समोर आले आहे. कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही बसस्थानकांवर प्रवाशांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
अनेक ठिकाणी बसथांब्यांवर बसण्यासाठी योग्य फलाट नाही, छप्पर नाही, तसेच काही बसथांब्यांवर नावफलकही दिसून येत नाहीत. उन्हाळा, पावसाळा आणि गर्दीच्या वेळेत प्रवाशांना उभे राहून बसची वाट पाहावी लागत असून महिला, वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
बससेवा सुरू करून सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याचा महापालिकेचा प्रयत्न स्तुत्य असला, तरी त्यास पूरक पायाभूत सुविधा अद्याप अपुऱ्या असल्याचे स्पष्ट दिसते. संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन बसथांब्यांवर छप्पर, बसण्यासाठी बाक, नावफलक व स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ★★★

Scroll to Top