बदलापूर–खोपोली मार्गावर विकासाच्या नावाखाली सावलीचा लोप; प्रवाशांचे हाल

®अधिवेशन वृत्तसेवा, बदलापूर : बदलापूर ते खोपोली या मार्गावर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. रुंद रस्ते, आलिशान फार्महाऊस, क्लब्स आणि ‘ऍग्रो टुरिझम’ प्रकल्प उभे राहिल्याने परिसराचे रूप पालटले आहे. मात्र या विकासाच्या धडाक्यात रस्त्यालगतची झाडे मोठ्या प्रमाणात तोडली गेल्याने प्रवाशांसाठी सावलीचा अभाव निर्माण झाला आहे. पूर्वी या मार्गावर प्रवास करताना वड, पिंपळ यांसारखी मोठी झाडे वाटसरूंना दिलासा देत होती. मात्र आता किलोमीटरच्या किलोमीटर अंतरावर एकही झाड दिसत नसल्याने विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचारी प्रचंड उन्हाचा सामना करत आहेत. एसी गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना याची तीव्रता जाणवत नसली तरी कष्टकरी वर्गाला या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, ‘निसर्गाच्या सानिध्यात’ अशी जाहिरात करणारे प्रकल्प वाढत असताना प्रत्यक्षात निसर्गाचा ऱ्हास होत आहे. रिसॉर्ट्स आणि फार्महाऊसमध्ये पोहण्याचे तलाव असले तरी रस्त्यावर प्रवाशांसाठी साधी सावलीही उपलब्ध नाही, ही विरोधाभासी स्थिती असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रस्ते रुंदीकरण आणि विकासकामे करताना पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने आणि व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. पर्यटन आणि विकास महत्त्वाचा असला तरी तो माणुसकी आणि पर्यावरण जपतच व्हावा, अन्यथा हा प्रवास केवळ अंतराचा नसून माणुसकी हरवण्याचा ठरेल, अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

Scroll to Top