नागरिकांना पोलीस ठाण्यातील अनुभवाबाबत देता येणार मत

®अधिवेशन वृतसेवा, भाईंदर : मिरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतील उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी दुपारी 4 वाजता आयुक्त कार्यालयातील ‘संवाद हॉल’ येथे करण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पोलीस ठाण्याला भेट देणारे नागरिक, तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना आलेला अनुभव तात्काळ नोंदविण्याकरता क्युआर कोड आधारित स्टॅन्डी (फलक) दर्शनी भागात ठेवण्यात येणार आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे मूल्यांकन करुन त्यांना पोलीस ठाण्यात आलेल्या अनुभवाबाबत तात्काळ अभिप्राय ई – फीडबॅकच्या मदतीने नोंदवता येणार आहे. प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस कटिबद्ध आहेत. भीती किंवा प्रलोभनाला बळी न पडता या देशाच्या कायद्याची कसोशीने अंमलबजावणी करण्याचा आमचा संकल्प आहे. असे त्यांनी संगितले. पोलीस ठाण्यात तक्रार / इतर कामाकरता येणार्‍या सामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यास भेट दिल्यानंतर कशा प्रकारचा अनुभव आला ? त्यांना मदत झाली का ? किंवा त्यांचे काम झाले का ? याबाबतचे त्यांचे मत/अभिप्राय नोंदविणेकरता प्रत्येक पोलीस ठाण्यात क्युआर कोड बेस स्टॅन्डी (फलक) दर्शनी भागात ठेवण्यात येणार आहे. क्युआर कोड गुगल स्कॅनरच्या मदतीने स्कॅन केल्यावर आलेली लिंक ओपन केल्यानंतर प्रश्नावली असलेला फॉर्म दिसून येणार. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषा देखील निवडता येतील.त्यानंतर संबंधित व्यक्तीचे नाव व मोबाईल क्रमांक नोंदवावा लागणार आहे. संबंधित व्यक्तीचे पोलीस ठाण्यात कोणते काम होते ? त्या ठिकाणी कोण अधिकारी भेटले ? कोणत्या गुन्ह्या करता आले होते? पोलीस ठाण्यातील स्वच्छता ? पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांना केलेली मदत ? पोलिसांची वागणूक ? त्यांचे पोलीस ठाण्यातील काम झाले का ? अशा प्रकारची प्रश्नावली असलेली माहिती त्यात भरावी लागणार आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी जनतेला आवाहन केले आहे की, तक्रारदार नागरिक यांनी पोलीस ठाण्यात त्यांच्या कामाकरता भेट दिल्यानंतर त्यांना आलेले अनुभव, मत याबाबतचे अभिप्राय नोंदविण्याकरता त्यांनी क्युआर कोड आधारित प्रणालीचा जास्तीत-जास्त वापर करावा. नागरिकांनी सुचविलेल्या काही चांगल्या गोष्टी विचारात घेऊन त्याप्रमाणे पोलिसांच्या दैनंदिन कामकाजात सुधारणा, बदल घडवता येतील व त्यातुन पोलीस व जनता यांच्यातील संबंध अधिक चांगल्याप्रकारे दृढ होतील. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’, या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीद वाक्याला स्मरून आम्ही समाजातील सद्प्रवृतींचे रक्षण तसेच अपप्रवृतींवर अंकुश ठेवण्याचा सतत प्रयत्न करू. कायदे व नियमांचे पालन करून आपण आमच्या या प्रयत्नांना साथ द्यावी ही विनंती. आपल्या एकत्रित प्रयत्नातून मिरा-भाईंदर, वसई-विरार सुरक्षित आणि समृद्ध बनेल याची मला खात्री वाटते. असे त्यांनी संगितले. सदर कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे हे उपस्थित होते. ★★★★★

Scroll to Top