
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर, दि. २९ जून २०२५ : राज्य शासनाने दिनांक १४ मार्च २०२४ रोजी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार, आता शासकीय पदावरील व्यक्तींच्या नेमप्लेटवर वडिलांच्या नावासोबतच मातांचेही नाव नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिलांना सन्मान देण्याच्या या पुढाकाराची अंमलबजावणी राज्यभर सुरु झाली असून, उल्हासनगर परिमडळ 4, अंतर्गत विठ्ठलवाडी पोलीस ठाणे याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. विक्रम रामसिंग गौड यांनी आपल्या नेमप्लेटवर आईचे नाव टाकत या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या नावासमोर “आई: [शकुंतला]” असा उल्लेख असून, त्यामुळे नागरिकांमध्ये कौतुकाची लाट पसरली आहे.
श्री. गौड यांनी सांगितले की, “आई हे प्रत्येकाच्या आयुष्यातील आधारस्तंभ असते. शासनाच्या या निर्णयामुळे मातेला मिळणारा सन्मान अधिक दृढ होईल. याची सुरुवात स्वतःपासून करणे गरजेचे होते.”
या स्तुत्य उपक्रमामुळे समाजात आईच्या स्थानाची जाणीव अधिक ठळकपणे अधोरेखित होत आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, इतर पोलीस ठाण्यांनी आणि शासकीय कार्यालयांनीही यापासून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.